
चौगाव किल्ल्याच्या पायथ्याशी नक्षीदार दगडांचा खजिना सापडला
चौगाव किल्ल्याच्या पायथ्याशी नक्षीदार दगडांचा खजिना सापडला
चोपडा प्रतिनिधी: नुकतीच शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने चौगाव किल्ला परिसरात शोध मोहीम आयोजित करण्यात आली. किल्ल्यावर नेहमी फिरण्याच्या पारंपारिक मार्गांव्यतिरिक्त पायथ्याशी आणि परिसरातील अदृश्य अवशेषांचा शोध घेणे या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
मोहीमेच्या दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अनेक पुरातन बांधकामाचे अवशेष आढळले. यामध्ये खंडीत झालेला नंदी, नक्षीदार दगड, नक्षीदार खांब, मंदिराचा चौथरा आणि इतर अनेक अवशेष सापडले. काही अवशेष अजून मातीत दबलेले आहेत, त्यामुळे किल्ल्याच्या पायथ्याशी कदाचित मंदिर असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्याचबरोबर दोन समाधीस्थळे आढळली, तसेच अनेक पायरीच्या आकाराचे घडीव दगड आढळून आले. यावरून अंदाज आहे की किल्ल्यावर पूर्ण पायर्या असाव्यात.
तसेच, चौगाव येथील काही दुर्गप्रेमी आणि वनमजूरांनी गवळी वाड्याची साफसफाई केली, ज्या दरम्यान अनेक खोल्यांचे अवशेष दिसून आले. सत्तावीस एकर परिसरात विस्तारलेल्या किल्ल्याच्या पूर्वेकडील भागात शाबूत तटबंदी आणि हत्ती तलाव, तर पश्चिमेकडे अनेक बुरुज, दोन मुख्य प्रवेशद्वार, गवळी वाडा, सप्ततलाव, क्षतिग्रस्त प्राचीन मंदिर, धबधबा, राणी काजल समाधी आणि उत्तरेला फतर्या मारोती या महत्त्वाच्या ठिकाणांचा शोध लागला.
ही मोहीम चौगाव किल्ल्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकणारी ठरली असून, येथील अधिक अवशेषांचा अभ्यास पुढील शोध मोहीमांमध्ये सुरू राहणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम