
छेड काढल्याच्या जाब विचारल्यावरून तिघांना मारहाण ; सात जणांविरुद्ध गुन्हा
छेड काढल्याच्या जाब विचारल्यावरून तिघांना मारहाण ; सात जणांविरुद्ध गुन्हा
अमळनेर | प्रतिनिधी
मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने सात जणांनी मिळून तिघांना लाथाबुक्क्यांनी, दगड-विटांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामानिमित्त बडोदा येथे वास्तव्याला असून त्यांची पत्नी व दोन मुली हिंगोणे बुद्रुक येथे राहतात. दि. १० ऑक्टोबर रोजी फिर्यादीच्या पत्नीने त्यांना फोनवर माहिती दिली की, त्यांच्या १५ वर्षीय मुलीची, घरात असताना, हितेश मिलिंद साळुंखे या तरुणाने घरात घुसून छेड काढली. हा प्रकार ऐकल्यानंतर फिर्यादी तत्काळ दुसऱ्या दिवशी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी गावी परतले.
सकाळी सुमारे अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी घराजवळ उभे असताना मिलिंद साळुंखे, हितेश मिलिंद साळुंखे, मनीषा मिलिंद साळुंखे, ललिता फकिरा थोरात, सीमा पवार, अशोक छगन थोरात आणि जिजाबाई अशोक थोरात हे सातजण तेथे गोळा झाले. त्याचवेळी मिलिंद साळुंखे याने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार केला. परिणामी फिर्यादी खाली कोसळले आणि इतर संशयितांनी दगड, विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, फिर्यादीची पत्नी वाचवण्यासाठी धावून आली असता तिच्यावरही हल्लेखोरांनी विटा फेकून आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या सात जणांनी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचे केस पकडून तिला बाहेर ओढले आणि तिच्या तोंडावर, डोक्यावर व छातीवर प्रहार केले. शिवाय सर्वांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मारवड पोलिस ठाण्यात या सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम