
जळगावचे संघपती सेवादास दलिचंद जैन यांना ब्रज मधुकर अर्चना लाईफ टाईम अचिव्हमेंट’ प्रदान
जळगावचे संघपती सेवादास दलिचंद जैन यांना ब्रज मधुकर अर्चना लाईफ टाईम अचिव्हमेंट’ प्रदान
जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव येथील जैन समाजाने आपल्या सामाजिक आणि धार्मिक कार्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे जळगावच्या जैन संघ एकतेचा भारतात वेळोवेळी गौरवोल्लेख होतो. या एकतेसाठी, समाज कार्यासाठी तसेच साधु-संतांच्या सेवेत अग्रणी व्यक्तीमत्त्व संघपती सेवादास दलिचंद जैन यांना ‘ब्रज मधुकर अर्चना लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. चेन्नई येथील जय ब्रज मधुकर समितीतर्फे जैन हिल्स येथे आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यक्तीच्या सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच या कार्यक्रमात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना समाज, संस्कृती, परंपरा आणि सेवा याविषयी महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ‘मारवाड रत्न’ पुरस्काराची घोषणा करून तो त्यांना लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.
हा भव्य समारंभ जैन हिल्स येथील आकाश प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. प्रथम युवाचार्य बहुश्रुत, पंडितरत्न प.पु. मिश्रीमल जी म.सा. ‘मधुकर’ यांच्या अंत्येवासीनी सुशिष्या काश्मीर प्रचारिका, राजगुरुमाता प.पु. उमरावकुँवर जी अर्चना यांच्या १०३ व्या जन्मोत्सवानिमित्त हा विशेष कार्यक्रम साजरा झाला. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तलंगणा, तमिळनाडू तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून आलेल्या श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरण हा पुरस्कार प्रदान केला गेला.
माजी खासदार ईश्वरलालजी जैन यांनी आपल्या मनोगतात जळगाव श्री संघाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “जळगाव श्री संघाचे वैशिष्ट्य म्हणजे विविधतेतून एकता. जैन धर्मातील सर्व पंथ एकत्र येऊन एकच महावीर जयंती साजरी करतात, ज्यामुळे समाजाची आदर्श एकता दिसून येते.”
आपल्या सत्काराला उत्तर देताना दलिचंद जैन म्हणाले, “वाकोदसारख्या छोट्या गावातून आमचा परिवार आला. हा विकास केवळ शिक्षणामुळे शक्य झाला. समाजात आणि संघात एकता असणे अत्यंत आवश्यक आहे. मतभेद असू शकतात, परंतु मनभेद नसावेत. कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी एकमेकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. हा पुरस्कार मी माझ्या प्रत्येक जैन संघ सदस्याला अर्पण करतो…” जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा ‘सार्थक करू या जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे…’ हा संदेश उपस्थितांना देत या गौरवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
लॅण्ड, लायब्ररी अन् लॅबरेटरी प्रेमी-भवरलालजी जैन
जैन हिल्स हे कृषीक्षेत्रातील अलौकीक कार्य येथे उभे राहिले आहे. श्रध्देय भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीने तसेच सततच्या परिश्रमाने हा परिसर सजला आहे. त्यातून हे विशाल कार्य उभे राहिले. ही प्रेरणा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरते. आपल्या आयुष्यात त्यांनी तीन ‘L’ वर प्रेम केले. हे ३ एल म्हणजे लॅण्ड, लायब्ररी आणि लॅबरोटरी होय. जैन हिल्स येथील पर्यावरणपुरक वातावरण त्यांच्या परिश्रमाचे प्रतिक असल्याचा गौरव विशेष धर्मसभेत करण्यात आला. जैन इरिगेशचे विद्यमान अध्यक्ष. अशोक जैन यांनी ‘३२ आगमाचे सार एकाच ग्रंथात उपलब्ध करण्याची इच्छा व्यक्त केली. यामध्ये पाली, इंग्रजी, हिंदी मध्ये प्रकाशित करून हे आगम वैश्विक पातळीवर पोहोचेल असा विश्वास देखील कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.
प्रथम युवाचार्य बहुश्रुत, पंडितरत्न प.पु. मिश्रीमल जी म.सा. ‘मधुकर’ यांच्या अंत्येवासीनी सुशिष्या काश्मीर प्रचारिका, राजगुरुमाता प.पु. उमरावकुँवर जी अर्चना यांच्या १०३ व्या जन्ममहोत्सवानिमित्त भावांजली अर्पण करताना, श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवार्तीनी प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी सांगितले की, “त्यांच्या समवेत मला सावलीसारखे राहण्याची सुवर्णसंधी लाभली,” असे सांगून आजच्या विशेष प्रवचनात कृतज्ञता व्यक्त केली. जैन हिल्स येथील पर्यावरणपूरक कार्य आणि भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीचे प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांच्याकडून कौतुक करण्यात आले. केवळ स्वतःचा विचार न करता सृष्टीतील प्रत्येक सजीवाचा विचार केला आणि त्या दिशेने कार्य केले तर किती मोठे कार्य उभे राहू शकते त्याचे हे परिसर उत्तम उदाहरण ठरतो.
या कार्यक्रमास किशोर मुथा-हैदराबाद, लुणकरण कोठारी सुरत, तुलसीजी बोथरा, दिलीप चोपडा, नंदलाल गादिया, संजय बाफना-उज्जैन, विनोद मुनोत, पारस राका, विनय पारख, अमर जैन, जितेंद्र कोठारी, प्रवीण पगारिया इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम