जळगावच्या केळी पिकाच्या ओलावृष्टि-विमा संरक्षण ३१ मेपर्यंत वाढवण्याची संसदेत मागणी – खा.स्मिता वाघ

बातमी शेअर करा...

जळगावच्या केळी पिकाच्या ओलावृष्टि-विमा संरक्षण ३१ मेपर्यंत वाढवण्याची संसदेत मागणी – खा.स्मिता वाघ

जळगांव : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी आज केंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील लाखो केळी उत्पादक शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. देशातील सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगावचा गौरव असला तरी गेल्या काही वर्षांत अत्यंत अनिश्चित हवामान, अनियमित पाऊस, ओलावृष्टि, सलग उच्च आर्द्रता आणि अचानक होणारे वातावरणीय बदल यामुळे केळी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. या नुकसानाला सध्याच्या फळस्वर-हवामान आधारित विमा योजनेत पुरेसा कव्हरेज नसल्याची बाब स्मिताताईंनी ठामपणे समोर आणली.

सध्या विमा योजनेनुसार ओलावृष्टि जोखीम कालावधी १ जानेवारी – ३० एप्रिल असा निश्चित आहे. परंतु प्रत्यक्षात
मे महिन्याच्या अखेरीपर्यंत ओलावृष्टि आणि अत्यंत आर्द्रतेचा धोका कायम असतो.अनेक वेळा सलग ३-४ दिवस पाऊस आणि ६०% पेक्षा जास्त आर्द्रता राहते, ज्यामुळे केळी पिकाची वाढ, दर्जा व उत्पादनावर गंभीर परिणाम होतो.असे कृषी विभागाचे अहवाल आणि स्थानिक हवामान केंद्राचे आकडेवारी हे वास्तव अधोरेखित करतात.

“शेतकऱ्यांचे नुकसान हे केवळ नोंदींमध्ये दिसणाऱ्या दिवसापुरते मर्यादित नाही. प्रत्यक्ष हवामान परिस्थिती बदलत आहे. म्हणूनच विमा जोखीम कालावधी संरक्षणाची मुदत १ जानेवारी–३१ मे पर्यंत वाढविण्यात यावी हे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य, न्याय्य आणि तातडीचे आहे तसेच सलग अनेक दिवस टिकणाऱ्या प्रतिकूल हवामान स्थितींनाही बीमा कव्हरमध्ये समाविष्ट करावे असे खा. वाघ यांनी केंद्र सरकार कडे विनंती केली.

ही मागणी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देईल आणि त्यांच्या मेहनतीला योग्य सुरक्षा मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम