
जळगावमध्ये तरुणाच्या खून प्रकरणी चार आरोपी अटकेत; एक फरार
जळगावमध्ये तरुणाच्या खून प्रकरणी चार आरोपी अटकेत; एक फरार
एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : अशोक नगर येथील रहिवासी तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावर ए-वन भरीत सेंटरजवळ धारदार शस्त्रांनी वार करून शनिवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला होता. या खळबळजनक घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवघ्या २४ तासांत कारवाई करत चार संशयित आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.
खून झालेल्या तरुणाचे नाव आकाश पंडित भावसार (वय २७, रा. अशोक नगर, जळगाव) असे आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकाशची आई कोकिळाबाई भावसार यांच्या फिर्यादीवरून अजय मंगेश मोरे (वय २८, रा. कासमवाडी, जळगाव) आणि तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यानंतर शनिपेठ पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने तपासाला गती दिली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत अजय मोरेसह तीन अल्पवयीन आरोपींना अटक केली. काही आरोपी मित्रांकडे, तर काही नातेवाईकांकडे लपून बसले होते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील एक संशयित आरोपी कुणाल उर्फ सोनू चौधरी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम