
जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश : बांग्लादेशी तरुणीची सुटका, मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल
जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश : बांग्लादेशी तरुणीची सुटका, मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : “भारतामध्ये चांगल्या नोकरीचे स्वप्न दाखवून एका बांग्लादेशी तरुणीला देहविक्रीच्या दलदलीत ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील प्रोफेसर कॉलनीतील एका खासगी फ्लॅटमध्ये तिच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करवून घेत असल्याची माहिती पुणे येथील ‘फ्रिडम फर्म’ संस्थेला मिळताच त्यांनी तातडीने जळगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने कारवाई करत प्रोफेसर कॉलनीतील ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, रविंद्र कापडणे, महिला पोलिस अंमलदार अश्विनी सावकारे आणि पोहेका भारती देशमुख हे उपस्थित होते. तपासादरम्यान एका खोलीत डांबून ठेवलेली बांग्लादेशी तरुणी सापडली.*
फसवणूक करून देहविक्रीच्या दलदलीत
तपासात उघड झाल्यानुसार सदर तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून भारतात आणले गेले. नाशिक रेल्वे स्थानकावर तिची पूजा आत्माराम जाधव हिच्याशी ओळख झाली होती. तिच्याकडून पैशांसाठी जबरदस्तीने देहविक्री करण्यास सांगण्यात आले. विरोध करताच शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे पीडित तरुणीने सांगितले. पोलिसांनी तिला सुरक्षितपणे बाहेर काढून संरक्षणात घेतले आहे.
गुन्हा दाखल, टोळीचा शोध सुरू
या प्रकरणी पूजा आत्माराम जाधव हिच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा व परदेशी नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात आणखी किती तरुणी या रॅकेटचा बळी ठरल्या आहेत याचा तपास सुरू असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण
या प्रकारामुळे जळगाव शहर हादरून गेले आहे. एका बांग्लादेशी तरुणीला फसवून भारतात आणून तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा टोळ्यांच्या कारवायांमुळे शहराचे सामाजिक वातावरण कलुषित होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईचे संकेत
या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी संपूर्ण रॅकेटचा छडा लावण्याचे संकेत दिले असून, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम