
जळगावमध्ये बालविवाहाचे गंभीर प्रकरण उघड!
जळगावमध्ये बालविवाहाचे गंभीर प्रकरण उघड!
बाळाला जन्म दिल्यानंतर धक्कादायक खुलासा
१० जणांविरुद्ध गुन्हा दाखल; पतीला तातडीने अटक
जळगाव । जिल्ह्यात एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आल्याचे आणि तिने बाळाला जन्म दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत मुलीचे पती, तिचे आई-वडील, सासू-सासरे आणि लग्न लावण्यास मदत करणाऱ्या नातेवाईकांसह एकूण १० जणांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल केला असून, मुलीच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसूती झाल्यानंतर तिचे वय केवळ १७ वर्षे असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेचच तालुका पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
सूचना मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय पाटील आणि देविदास चिंचोरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. रुग्णालयातील नोंदी आणि पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेतून प्राप्त झालेल्या जन्मदाखल्यावरून ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीत उघड झाले की, १५ मार्च २०२४ रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह चोपडा तालुक्यातील एका तरुणासोबत लावून दिला होता. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार (Child Marriage Act) मुलीचे लग्नाचे किमान वय १८ वर्षे असणे बंधनकारक आहे, त्यामुळे हा विवाह पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो. विवाहानंतर ती गर्भवती राहिली आणि नुकताच तिने बाळाला जन्म दिला.
या गंभीर प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन ८ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित सर्व १० आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलीच्या पतीला ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. बालविवाह आणि अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि मोठी चिंता व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम