
जळगावमध्ये शिक्षकांसाठी भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळा; प्रा. प्रशांत पोळ यांचे मार्गदर्शन
जळगावमध्ये शिक्षकांसाठी भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळा; प्रा. प्रशांत पोळ यांचे मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) : भारताची प्राचीन ज्ञान परंपरा अडीच हजार वर्षांचा समृद्ध वारसा आहे आणि यावर आधारित ज्ञानसंपदा देशाला जागतिक गुरु बनविण्यात उपयुक्त ठरू शकते, असे प्रतिपादन दिल्ली वेब भारती संस्थेचे सल्लागार, साहित्यिक व चिंतक प्रा. प्रशांत पोळ यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला व मानव विद्या प्रशाळा आणि भारतीय मानव्य प्राच्यविद्या अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १९ सप्टेंबर रोजी शिक्षकांसाठी “भारतीय ज्ञान परंपरा (IKS)” विषयावर एकदिवसीय दिशादर्शन कार्यशाळा विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत प्रा. पोळ यांनी बीजभाषणात भारताच्या प्राचीन ग्रंथसंपदेतील ज्ञानसंपदेवर प्रयोग करणे आणि त्याचा प्रासंगिक उपयोग करण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यशाळेत मंचावर कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रशाळेचे संचालक प्रा. रामचंद्र भावसार उपस्थित होते.
प्रा. पोळ यांनी भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे तीन प्रमुख उद्दिष्टे सांगितली –
भारताचा स्वर्णीम इतिहास जनमानसापर्यंत पोहचवणे.
इतिहासाचे श्रेय तत्कालिन महापुरुषांना मिळावे.
इतिहासातील शोध आणि ग्रंथ आजही प्रासंगिक आहेत.
ते म्हणाले की, ऋग्वेदातील प्रकाश वेगावरील गणना, परमार वंशाचे राजा समरांगण सूत्रधार यांचे वास्तुकला ग्रंथ, जल व्यवस्थापनावर आधारित ग्रंथ, पंचमहाभूतांचा अभ्यास, पराशर ऋषींचे हवामान अंदाज ग्रंथ, नोबेल पारितोषिक विजेते जगदिशचंद्र बोस यांचे वनस्पती संबंधी प्रयोग, स्थितीस्थापकता सिद्धांत, वराह मीर यांची प्राचीन वास्तुकला, चीनमधील बोधिधर्मण यांचे खेळाविषयक योगदान हे सर्व ज्ञानसंपदेचे उदाहरण आहेत.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी शिक्षकांना आवाहन केले की, भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करावी. व्य. प. सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी कार्यशाळेच्या उद्देशाचे महत्त्व स्पष्ट केले व नव्या शैक्षणिक धोरणाचा वापर भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी उपयोगी ठरेल असे सांगितले.
सकाळी १० वाजता कला व मानव विद्या प्रशाळेतील भारतीय परंपरा व ज्ञान प्राच्यविद्या अध्ययन कक्षाचे उद्घाटन प्रा. प्रशांत पोळ यांच्या हस्ते तुळशी वृंदावनास जल समर्पित व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रा. पोळ यांनी भारतीय साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गौरवशाली परंपरा स्पष्ट केली आणि सांगितले की, भारतीय ज्ञानभंडारामुळे देशात आत्मविश्वास असलेली पिढी निर्माण होईल.
कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात डॉ. भरतदादा अमळकर यांच्या उपस्थितीत खुले चर्चासत्र पार पडले. सूत्रसंचालन डॉ. वीणा महाजन यांनी केले तर समारोप सत्राचे आभार डॉ. तुषार रायसिंग यांनी मानले. कार्यशाळेत २२० शिक्षक उपस्थित होते आणि समारोपानंतर सहभागींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम