
जळगावमध्ये उद्या संडे ऑन सायकल उपक्रम
जळगावमध्ये उद्या संडे ऑन सायकल उपक्रम
सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी
भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत “फिट इंडिया” उपक्रमाच्या अंतर्गत नागरिकांमध्ये दैनंदिन फिटनेसची सवय निर्माण करण्यासाठी ‘संडे ऑन सायकल’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 2 मार्च २०२५ रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, खेळो इंडिया सेंटर, सायकलिंग क्लब आणि स्थानिक शाळा यांच्यावतीने हा उपक्रम राबवला जाणार आहे. नागरिकांनी आणि क्रीडाप्रेमींनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी व नागरिकांनी https://fitindia.gov.in/cyclothon-२०२५ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. सहभागींची नोंदणी ऑनलाइन पद्धतीनेच केली जाणार आहे.
नागरिकांमध्ये फिटनेसविषयी जागरूकता
फिट इंडिया चळवळीअंतर्गत शारीरिक तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. “दररोज नियमित व्यायाम आणि सायकलिंगमुळे आरोग्य सुधारते. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,” असेही नाईक यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात प्रथमच या उपक्रमाचे आयोजन होत असून, नागरिक व युवक यांचा मोठा प्रतिसाद द्यावा असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम