
जळगावातील ‘कॅफे कॉलेज कट्टा’वर पोलिसांचा छापा; अश्लील कृत्ये करणाऱ्या जोडप्यांना रंगेहात पकडले
जळगावातील ‘कॅफे कॉलेज कट्टा’वर पोलिसांचा छापा; अश्लील कृत्ये करणाऱ्या जोडप्यांना रंगेहात पकडले
कॅफे चालकावर गुन्हा दाखल; पालकांना पाचारण करून समज देण्यात आली
जळगाव: जामनेर येथील एका कॅफेमध्ये घडलेल्या गंभीर घटनेची दखल घेत, जळगावातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘कॅफे कॉलेज कट्टा’ नावाच्या कॅफेवर आज (गुरुवारी, १४ ऑगस्ट) पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात, अश्लील चाळे करणाऱ्या सात जोडप्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची कारवाई
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त माहिती मिळाली होती की, ‘कॅफे कॉलेज कट्टा’ येथे गाड्यांमध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट करून, पडदे लावून आणि अंधार करून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना गैरकृत्ये करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुपारी अचानक कॅफेवर छापा टाकला.
जोडप्यांना पकडून पालकांना बोलावले
या छाप्यात सात जोडपी अश्लील चाळे करताना आढळून आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आली. या कॅफे शॉपमध्ये कोणताही परवाना लावलेला नव्हता. पोलिसांनी कॅफे चालक मुकेश चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अशा गैरप्रकारांना आळा घालणाऱ्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम