
जळगावात अंडापावच्या गाडीवर किरकोळ वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला
जळगाव: शहरातील गिरणा टाकी परिसरात अंडापावच्या गाडीवर झालेल्या किरकोळ वादामुळे दोघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजता घडली. या हल्ल्यात रणजीतसिंग जीवनसिंग जून्नी (वय ३२) आणि प्रियांशू विद्यासागर सिंग (वय २०) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रामानंद नगरजवळील गिरणा टाकी परिसरातील एका अंडापावच्या गाडीवर रणजीतसिंग जून्नी अंडापाव खाण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचे टेबलावर बसण्यावरून काही तरुणांशी वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने, तेथे असलेल्या दोन ते तीन तरुणांनी रणजीतसिंगवर धारदार शस्त्राने वार केले. यात त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली.
याचवेळी त्या गाडीवर अंडापाव खात असलेला प्रियांशू सिंग याच्यावरही हल्लेखोरांनी वार केले, ज्यात तो मांडीला गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम