
जळगावात अवैध घरगुती गॅस रिफिलिंगवर कारवाई
जळगावात अवैध घरगुती गॅस रिफिलिंगवर कारवाई
जळगाव प्रतिनिधी शहरात जीव धोक्यात घालणाऱ्या अवैध घरगुती गॅस रिफिलिंगविरोधात पोलिसांनी निर्णायक पाऊल उचलत मोठी कारवाई केली. जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने, रामानंद पोलीस ठाण्याच्या सहकार्याने हरिविठ्ठल नगरातील गोरख महाराज हनुमान मंदिर चौकात धाड टाकून एका व्यक्तीस रंगेहात पकडले. या कारवाईत ३ भरलेल्या गॅस हंड्या, १ प्रेशर मोटर, रेग्युलेटर यांसह लाखो रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हरिविठ्ठल नगर परिसरातील एका घरात घरगुती गॅस सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये किंवा वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचा धोकादायक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. अशा अवैध रिफिलिंगमुळे यापूर्वी शहरात स्फोट होऊन मनुष्यहानी झाल्याच्या घटना घडल्या असल्याने पोलिसांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने घेतले.
पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली विशेष पथक तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखालील या कारवाईत उपविभागीय कार्यालयातील स.फौ. कैलास सोनवणे, पो.ना. रविंद्र मोतीराया, पो.कॉ. अशोक पुसे, तसेच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि त्यांच्या टीमने संयुक्त छापा टाकला.
छाप्यादरम्यान घरात एक व्यक्ती घरगुती गॅस सिलिंडरमधून प्रेशर मोटरच्या साहाय्याने छोट्या गॅस हंडीत गॅस भरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम