
जळगावात आजी/माजी सैनिकांसाठी ‘समाधान शिबीर’
अभिलेख विभागाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव, ;- महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील आजी/माजी सैनिकांसाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, जळगाव आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समाधान शिबिरा’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिनांक ०७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा सैनिक कल्याण हॉल, महाबळ येथे पार पडले.
या समाधान शिबिरात आजी माजी सैनिकांच्या भूमी अभिलेखासंदर्भातील शेत जमीन प्लॉट मोजणी, आणि सिटी सर्व्हे मिळकतींवर मालक सदरी खरेदीने, वारसाने, मृत्यूपत्रानुसार नोंद करणे बाबत अडचणींचे निवारण करण्यात आले.
या शिबिरात जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुगुटराव मगर यांनी सैनिकांना भूमि अभिलेख विभागातील विविध ऑनलाईन सेवा सुविधांची माहिती दिली. आता सैनिक बांधवांना त्यांच्या जमिनीच्या चतुः सिमा नकाशा, मिळकत उतारा, ऑनलाईन मोजणी अर्ज आणि वारसा हक्काच्या फेरफार अर्जासारख्या सुविधा घरबसल्या उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शेतजमीन मोजणी, नकाशे आणि फेरफार नोंदींसंबंधी आजी/माजी सैनिकांच्या ज्या काही समस्या होत्या, त्यांचे निराकरण या शिबिरात करण्यात आले. ऑनलाईन सुविधा वापरताना येणाऱ्या अडचणी त्वरित सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाचे संयोजक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, माजी एन एस जी कमांडर ईश्वर मोरे आणि जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, जळगाव मुगुटराव मगर यांनी या शिबिराचे नियोजन केले. या समाधान शिबिरात सुमारे १०० माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. याव्यतिरिक्त उपअधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी वसंत सोनवणे, दत्तात्रय वाघ, शितल लेकुरवाळे, राजू घेटे, मुकुल तोटावार, पंडीत पाटील आणि भूमि अभिलेख विभागातील इतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम