जळगावात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

बातमी शेअर करा...

जळगावात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

जळगाव: शहरात काल (६ सप्टेंबर) लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीनिमित्त शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. महापालिकेच्या मानाच्या गणपतीची आरती करून सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मार्गावर एकापाठोपाठ मार्गस्थ झाली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

११ दिवस मंडपात आणि घरोघरी विराजमान असलेल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी निघालेल्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, महिला व पुरुष अंमलदार, आरसीपी प्लाटून, क्यूआरटी पथक असे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात होते. तसेच, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकही मिरवणुकांवर लक्ष ठेवून होते.

या मिरवणुकांवर ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात होती. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वेळेचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांनी वेगवेगळे आकर्षक सादरीकरण केले. प्रत्येक मंडळाला सादरीकरणासाठी पाच ते सात मिनिटांचा वेळ ठरवून देण्यात आला होता. या काळात उत्कृष्ट वाद्य वादनासह वारकरी संप्रदायाच्या परंपरेचेही दर्शन मिरवणुकीत घडले.

या मिरवणुकीसाठी कोर्ट चौकापासून विसर्जन मार्गाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबवून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. या मार्गावर फक्त गणेश मंडळांची वाहने आणि पायी जाणाऱ्या गणेशभक्तांना प्रवेश देण्यात आला होता.

मानाच्या गणपतीच्या आरतीवेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह अनेक गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम