जळगावात तरुणाला जमावाची मारहाण ; दुचाकी पेटविली

बातमी शेअर करा...

जळगावात तरुणाला जमावाची मारहाण ; दुचाकी पेटविली

जळगाव प्रतिनिधी – शहरातील मोहाडी रोड परिसरात लव जिहादच्या संशयावरून जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याची दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) दुपारी सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेला तरुण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, पोलिसांनी ८ ते १० संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एक तरुण आणि तरुणी मोहाडी रोड परिसरात एका दुकानाजवळ थांबले होते. यावेळी काही स्थानिक युवकांनी त्यांच्याशी विचारपूस केली. या दरम्यान, किरकोळ वाद निर्माण झाला आणि त्यात तरुणाने अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि जमावाने संतापाच्या भरात तरुणाला मारहाण केली.

संतप्त जमावाने पुढे तरुणाची दुचाकी पेटवून दिली, ज्यामुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.

जखमी तरुणाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी ८ ते १० संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी जिल्हा रुग्णालय परिसर आणि मोहाडी रोड भागात बंदोबस्त वाढवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम