
जळगावात तोतया पोलिसांनी वृद्धाला फसविले !
80 हजार रुपये घेऊन रफू चक्कर !
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील राष्ट्रीय महामार्गाजवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर ६२ वर्षीय वृद्धाला बनावट पोलिसांनी गंडा घालत ८० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसे घडले प्रकरण?
सिंधी कॉलनी येथील रामचंद्र चतरुमल पारप्यानी (वय ६२) हे मंगळवारी सकाळी त्यांच्या दुचाकीने (एमएच १९-९६९) जुना मेहरूण रोड, बाबा नगर मार्गे जात होते. त्याचवेळी रिलायन्स पेट्रोल पंपासमोर दोन व्यक्तींनी त्यांना थांबवले आणि आम्ही पोलीस आहोत, पुढे वाहन तपासणी सुरू आहे असे सांगितले.
गंडा घालण्याची शिताफी
या दोघांनी पारप्यानी यांच्याकडील २० हजार किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ३० हजारांची सोन्याची चैन व लॉकेट, तसेच ३० हजारांची रोकड असा एकूण ८० हजारांचा ऐवज काढून ठेवायला सांगितला. हा ऐवज त्यांनी तुमच्या ऍक्टिवाच्या डिकीमध्ये ठेवतो असे सांगत लंपास केला.
फिर्यादीने दिली तक्रार
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पारप्यानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३० ते ४० वयोगटातील आरोपींचा शोध सुरू आहे. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहेत.
—

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम