
जळगावात दोन गटात तुफान दगडफेक; किरकोळ कारणावरून राडा, दोन जखमी
जळगावात दोन गटात तुफान दगडफेक; किरकोळ कारणावरून राडा, दोन जखमी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ चौकात मंगळवारी रात्री किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीत दोन तरुण किरकोळ जखमी झाले असून, घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार, २२ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ चौकातील एका अपार्टमेंटजवळ काही तरुण उभे असताना, दुचाकीवरून आलेल्या दहा-बारा जणांच्या टोळक्याने अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले व नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी इतरत्र धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच गस्त घालणाऱ्या एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या आगमनाची चाहूल लागताच दगडफेक करणारे तरुण घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आली.
या संदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी सांगितले की, एका मेडिकल स्टोअरमधून तरुणाला बाहेर काढल्याच्या वादातून हे प्रकरण घडले असून दोन गटांमध्ये किरकोळ दगडफेक झाली आहे. दोषींविरोधात लवकरच कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
घटनास्थळी पोलिसांची बंदोबस्त वाढवण्यात आली असून, परिसरात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम