
जळगावात दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास
जळगावात दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास
जळगाव (प्रतिनिधी) – विजयादशमीच्या रात्री शहरात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हात साफ केला. खोटे नगर परिसरात रावण दहन पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून चोरट्यांनी रोख ७० हजार रुपये आणि दागिन्यांसह एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, तर बालाजी पेठ परिसरात सुवर्णकाराच्या कारखान्यातून १०० ग्रॅम सोने लंपास करण्यात आले. या दोन्ही घटना गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) रात्री घडल्या असून, शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रावण दहन पाहायला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी
सुरेश भागवत जगताप (वय ५१, रा. सत्यम पार्क, खोटे नगर) हे कुटुंबासह विजयादशमी निमित्त रावण दहन पाहण्यासाठी बाहेर गेले होते. दरम्यान, घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख ७० हजार रुपये, १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण १.७५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पत्नी व मुले घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
सुवर्णकाराच्या कारखान्यातून १०० ग्रॅम सोने गायब
बालाजी पेठ परिसरातील सुवर्ण दागिन्यांच्या कारखान्यातही गुरुवारी रात्री चोरी झाली. निखिल कैलास गौड हे राजस्थानी सुवर्णकार संध्याकाळी काम संपवून कारखाना बंद करून घरी गेले होते. त्यानंतर एका बंगाली कामगाराने संधी साधत १०० ग्रॅम सोने चोरून नेले. शुक्रवारी सकाळी निखिल गौड यांनी कारखाना उघडला असता चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात एक संशयित व्यक्ती दिसत आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या दोन चोरीच्या घटनांमुळे जळगाव शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम