
जळगावात महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनपोत लंपास
जळगाव: महालक्ष्मींच्या कार्यक्रमातून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरीने ओढून नेली. ही घटना १ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजता शहरातील नंदनवन कॉलनीत घडली. या सोनसाखळीची किंमत सुमारे ६० हजार रुपये आहे.
नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या उमा सतिष लाठी (वय ५८) या आपल्या जावा आणि मुलीसोबत गल्लीतील केदार देशपांडे यांच्या घरी महालक्ष्मींच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन परत आल्यानंतर त्या काही महिलांसोबत बोलत उभ्या होत्या. त्यानंतर घरी परत जात असताना, दुचाकीवरून तोंडाला मास्क लावलेले दोन तरुण त्यांच्याजवळ आले.
दुचाकीच्या मागे बसलेल्या तरुणाने उमा लाठी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली आणि दोघेही पसार झाले.
उमा लाठी यांनी आरडाओरड केल्याने काही लोकांनी चोरट्यांचा पाठलाग केला, पण चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरटे अंदाजे २० ते २५ वयोगटातील असावेत, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम