
जळगावात हद्दपार आरोपीसह चॉपरधारी तरुण जेरबंद
जळगावात हद्दपार आरोपीसह चॉपरधारी तरुण जेरबंद
जळगाव: शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी शनिपेठ पोलिसांनी दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तादरम्यान पोलिसांनी दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला आणि चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खून आणि प्राणघातक हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये संशयित असलेला महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन (वय ३२, रा. तळेले कॉलनी) याला दोन वर्षांसाठी जळगावातून हद्दपार करण्यात आले होते. तरीही तो रथ चौकात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच दिवशी, गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात पोलीस भिलपुरा-घाणेकर चौकात गस्त घालत असताना, त्यांना संदीप विजय नाथ (वय २८, रा. नाथ गल्ली, तांबापुरा) हा हातात चॉपर घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडून त्याच्याकडील धारदार चॉपर जप्त केला. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी आणि उपनिरीक्षक योगेश ढिकले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलीस हवालदार प्रमोद पाटील, शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, नवजीत चौधरी, योगेश साबळे, रवींद्र तायडे, निलेश घुगे, अमोल बंजारी, पराग दुसाने आणि प्रतिभा खैरे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम