
जळगावात हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा ; मुद्देमाल जप्त; मालकासह मॅनेजरविरुद्ध गुन्हा
जळगावात हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा ; मुद्देमाल जप्त; मालकासह मॅनेजरविरुद्ध गुन्हा
जळगाव: शहरात विनापरवाना हुक्का पार्टी सुरू असलेल्या एका हॉटेलवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. पोलिसांनी या हॉटेलमधून बेकायदेशीररित्या विक्री होणारे मद्य, हुक्का आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १२ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकासह मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या हॉटेल ‘सरोवर’मध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्टी चालत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेलवर छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी हॉटेलमधून विनापरवाना विक्री होणाऱ्या बिअरच्या बाटल्या, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, तसेच विविध फ्लेवर्सचा हुक्का आणि संबंधित साहित्य जप्त केले. याप्रकरणी हॉटेल मालक गिरीशसागर गोपालदास वलथानी (रा. सिंधी कॉलनी) आणि मॅनेजर अमित शिवनारायण वर्मा (वय ३६, रा. कालिंका माता चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाप्यादरम्यान हुक्का ओढणाऱ्या काही तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या अशा इतर हॉटेलवरही आता पोलिसांची नजर असणार आहे, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पाटील करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम