
जळगावात २० एप्रिल रोजी मराठा उद्योजकांचे महाअधिवेशना
जळगावात २० एप्रिल रोजी मराठा उद्योजकांचे महाअधिवेशना
राज्यभरातील दोन हजार उद्योजकांचा सहभाग
जळगाव | प्रतिनिधी मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेच्या वतीने खानदेशातील पहिलं आणि राज्यस्तरीय तिसरं मराठा उद्योजक महाअधिवेशन २० एप्रिल रोजी जळगावात होणार आहे. या अधिवेशनात राज्यभरातून सुमारे दोन हजार मराठा उद्योजक सहभागी होणार आहेत. यशस्वी उद्योजकांचे अनुभव, मार्गदर्शन आणि शासकीय योजनांची माहिती नवोदित उद्योजकांसाठी दिली जाणार आहे.
या अधिवेशनाबाबत जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी किरण बच्छाव, सुरेंद्र पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रमोद पाटील, शैलेंद्र चव्हाण, नितीन गावंडे, संगीता पाटील, प्रतिभा शिंदे, भगवान शिंदे आणि ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे आणि सत्रांचे आयोजन
अधिवेशनाचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उद्घाटक म्हणून पुण्याच्या मगरपट्टा सिटीचे संचालक सतीश मगर व सोलापूरच्या लक्ष्मी हायड्रोलिक्सचे शरद ठाकरे उपस्थित राहणार आहेत. आमदार मंगेश चव्हाण, रोहित निकम आणि किरण बच्छाव स्वागताध्यक्ष असतील. अधिवेशनाचे कार्यवाह म्हणून प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील काम पाहणार आहेत.
यशस्वी उद्योजकांसोबत संवाद, मार्गदर्शन, मुलाखती, चर्चासत्रे, आणि विविध व्यवसायविषयक सत्रे यामध्ये होणार आहेत. नॅचरल शुगर इंडस्ट्रीजचे बी.बी. ठोंबरे ‘उद्योगाची पायाभरणी व नियोजन’, विलास शिंद (सह्याद्री अॅग्रो फार्म) ‘शेतीतील आधुनिक संधी’, तर किर्दक ग्रुपचे सुनील किर्दक ‘उद्योजक कसा घडवावा?’ यावर मार्गदर्शन करतील.
नोंदणी आवश्यक; इतर समाजातील उद्योजकांनाही संधी
या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. इच्छुकांनी निवृत्ती पाटील (मो. ९४०३२५००६७) यांच्याशी संपर्क साधावा. अधिवेशनात इतर समाजातील उद्योजकांनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम