
जळगाव एसीबीची कारवाई : महावितरणचा कंत्राटी वायरमन लाच घेताना अडकला
जळगाव एसीबीची कारवाई : महावितरणचा कंत्राटी वायरमन लाच घेताना अडकला
जळगाव (प्रतिनिधी) – वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचा बनाव रचून वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच मीटर टेस्टिंग रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणमधील कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.
अटक झालेल्याचे नाव भूषण शालिग्राम चौधरी (वय ३७, रा. जळगाव) असून, तो प्रभात कॉलनी कक्षात कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होता.
तक्रारदाराच्या घरातील वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावावर होते. काही दिवसांपूर्वी चौधरीने त्यांच्या घरी येऊन मीटरचे सील तुटल्याचे सांगितले आणि वीज चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सांगून त्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ५ हजार रुपये घेण्याचे ठरले.
१० जून २०२५ रोजी तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. त्यानुसार, भूषण चौधरीने पंचासमक्ष लाच स्वीकारली आणि त्याच वेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली.
ही कारवाई पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्मिता नवघरे, चालक सुरेश पाटील, पोहेकॉ सुनील वानखेडे, पोकॉ अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली. रामानंद नगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम