
जळगाव जिल्हा बँकेत २२० लिपिक पदांची लवकरच भरती
एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठविला
जळगाव जिल्हा बँकेत २२० लिपिक पदांची लवकरच भरती
एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठविला
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लवकरच २२० लिपिक पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, यासाठी एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.
याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात शासनाने तातडीने पुनर्विचार करावा, असा ठरावही संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
बँकेच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष आमदार अमोल पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर जयश्री महाजन, तसेच नाना राजमल पाटील, घनश्याम अग्रवाल, शैलजा निकम, प्रदीप देशमुख आदी संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीनंतर माहिती देताना अध्यक्ष संजय पवार म्हणाले,“जिल्हा बँकेत २२० लिपिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी चार एजन्सींचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी एका एजन्सीची निवड करण्यासाठी सहकार आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
मंजुरी मिळताच भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल.”
बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रक्रियेतील विलंबाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कर्जमाफी लवकरात लवकर अंमलात आणावी, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली.
सध्या तीन लाखांपर्यंतच्या शेती कर्जावर शून्य टक्के व्याज आकारले जाते. ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवावी, असा आणखी एक ठराव यावेळी घेण्यात आला.बँकेचे संचालक आमदार यासंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून मोठ्या संस्था, कारखाने व साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असून, सहकार क्षेत्र अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम