
जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची पतसंस्थेतील भरती प्रक्रिया स्थगित
जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची पतसंस्थेतील भरती प्रक्रिया स्थगित
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची पतसंस्था लि. अर्थात ग.स. सोसायटीमधील नोकरभरती प्रक्रियेला जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली असून पुढील आदेश येईपर्यंत ती थांबविण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसंदर्भात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. सदर नोकरभरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, नामांकित एजन्सीमार्फत भरती न होता प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने राबविली जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. तसेच भरती करताना सेवानिवृत्त सभासद व सध्या कार्यरत सभासदांच्या संख्येत तफावत असल्याने ही भरती रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांना आवश्यक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी जे.एस. सोसायटीच्या नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश जारी केले आहेत.
यासोबतच सोसायटीला काही महत्त्वाची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भरती प्रस्ताव सादर करताना संस्थेची सध्याची सभासद संख्या, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सभासदत्व कमी झाले आहे काय, तसेच संचालक मंडळाने विभागीय अधिकाऱ्यांची पदे सेवानिवृत्तीनुसार भरावीत असा ठराव मंजूर केला आहे काय, याबाबतची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.
तसेच सध्याच्या सभासद संख्येच्या तुलनेत नवीन नोकरभरती करणे आवश्यक आहे का, भरती प्रक्रिया निष्पक्ष व भ्रष्टाचारमुक्त राहण्यासाठी संस्थेने कोणती उपाययोजना केली आहे, याची माहितीही सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सर्व माहिती सादर झाल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम