
जळगाव जिल्हा होमगार्डचा ७९ वा वर्धापन दिन सप्ताह उत्साहात
जळगाव जिल्हा होमगार्डचा ७९ वा वर्धापन दिन सप्ताह उत्साहात
संचलन परेड; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून मानवंदना
जळगाव : महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचा स्थापना दिवस ६ डिसेंबर १९४६ असून त्या अनुषंगाने मा. महासमादेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा होमगार्डतर्फे दि. ७ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत ७९ वा होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप आज, शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस मुख्यालय, जळगाव येथील कवायत मैदानावर आयोजित भव्य संचलन परेडने झाला.
वर्धापन दिन सप्ताहादरम्यान जिल्ह्यात तालुका पथकनिहाय वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शासकीय रुग्णालयात फळवाटप, गरजूंना कांबळेवाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच जळगाव शहरातील विविध शाळांमध्ये अग्निशमन व विमोचनाचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली. जळगाव, सावदा, भुसावळ, भडगाव व अमळनेर येथे श्री अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली तिमाही होमगार्ड संमेलनांचे आयोजन करून होमगार्डच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या.
समारोप समारंभानिमित्त आयोजित संचलन परेडची मानवंदना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव व डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी स्वीकारली. यावेळी जिल्हाधिकारी श्री घुगे यांनी मनोगतातून होमगार्डने समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत, होमगार्डसाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही दिली. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी होमगार्ड हा पोलीस विभागाचा महत्त्वाचा घटक असून प्रत्येक आपत्कालीन व सामाजिक कार्यात तो सक्रिय सहभाग घेत असल्याचे नमूद केले. होमगार्डचे कर्तव्य प्रामाणिक असून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी पोलीस भरतीमध्ये होमगार्ड जवानांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या संचलन परेडमध्ये होमगार्ड दलाचे तीन व पोलीस विभागाचे तीन असे एकूण सहा प्लाटून सहभागी झाले होते. परेडचे नेतृत्व श्री रवींद्र ठाकूर, वरिष्ठ पलटन नायक, जळगाव यांनी परेड कमांडर म्हणून केले, तर सहाय्यक परेड कमांडर म्हणून श्री विजय जावरे, वरिष्ठ पलटन नायक, यावल यांनी भूमिका बजावली. पोलीस विभागाच्या प्लाटूनचे नेतृत्व श्री देविदास वाघ (पो. उपनिरीक्षक), श्री मंसूरी (सहाय्यक पोलीस निरीक्षक) व श्री शांताराम देशमुख (पो. उपनिरीक्षक) यांनी केले. होमगार्ड प्लाटूनचे नेतृत्व श्री अनिल पाटील, व.प.ना., जळगाव; श्री भिला चव्हाण, प.ना.; श्रीमती मंगला वाणी, प.ना.; श्रीमती सविता पाचपांडे, प.ना.; श्री भावेश कोठावदे, प.ना.; तसेच श्री तुषार नेवे, प.ना. यांनी केले.
कार्यक्रमास श्री गणापुरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव; श्री संजय पाटील, समादेशक अधिकारी, जळगाव यांच्यासह एरंडोल, धरणगाव, वरणगाव, जामनेर, रावेर, यावल, पारोळा, अमळनेर आदी तालुक्यांतील पथक समादेशक अधिकारी व मोठ्या संख्येने होमगार्ड जवान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड, जळगाव यांनी केले, तर सूत्रसंचालन मदन रावते, पलटन नायक, जळगाव यांनी केले.
संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेला वर्धापन दिन सप्ताह हा श्री अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव पथकातील श्री कडू सपकाळे, श्री सचिन वाघ, नितीन भावसार, मधुकर मोरे, शिवदास कळसकर, नाथबुवा, शांताराम पाटील, कैलास भावसार, भरत बारी, ओमप्रकाश शिंपी, गणेश वाणी, निवृत्ती राखुंडे यांच्यासह सर्व अधिकारी व होमगार्ड जवानांनी स्वयंस्फूर्तीने परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम