
जळगाव जिल्ह्यात केळी निर्यातीसाठी मोठी संधी — रवींद्र माणगांवे
जळगाव जिल्ह्यात केळी निर्यातीसाठी मोठी संधी — रवींद्र माणगांवे
शेतीपूरक उद्योग उभारणीस मोठा वाव — संगिता पाटील
जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असून, येथे केळी निर्यातीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक ‘इको सिस्टीम’ उभारणे ही काळाची गरज असल्याचे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) चे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगांवे यांनी व्यक्त केले.
माणगांवे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित ‘जळगाव जिल्ह्यातील उद्योग व व्यापार वृद्धीविषयक चर्चासत्र’ हॉटेल रॉयल पॅलेस, जळगाव येथे शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले.
ते म्हणाले, “जिल्ह्यातील प्रत्येक गावातून किमान पाच व्यक्तींनी उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यापैकी एक जरी यशस्वी झाला तरी हजारो नवे उद्योजक जिल्ह्यात उभे राहतील. चेंबरतर्फे इच्छुकांना आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाईल. देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर लघुउद्योग आणि उद्योजक यांना पोषक वातावरण देणे गरजेचे आहे.”
चेंबरचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर म्हणाले, “महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व विभागांचा विचार करून एक सुस्पष्ट ब्लूप्रिंट तयार करणे आवश्यक आहे. जळगाव विभागाचा विचार केला असता, गेल्या तीन-चार वर्षांत उपाध्यक्षा संगिता पाटील यांनी केलेले काम मागील दशकाच्या कामाशी तुलनीय आहे.”
संगिता पाटील म्हणाल्या, “जळगाव जिल्हा शेतीप्रधान असून शेतीपूरक उद्योग उभारणीस मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जिल्ह्यात डाळ मिल, चटई उद्योग, विविध लघुउद्योग कार्यरत आहेत; वाहतुकीच्या उत्तम सोयी असूनही अपेक्षित औद्योगिक वाढ झालेली नाही. नवीन उद्योजकांना MIDC मध्ये जागा मिळत नसल्याने नवीन औद्योगिक वसाहतींची गरज आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी MACCIA अंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेतील नवीन MIDC साठी घोषणा केल्याने ही दिशा निश्चितच सकारात्मक आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “जिल्ह्यात शेतमालाचे प्रचंड उत्पादन होत असल्याने **एक्सपोर्टसाठी मोठी क्षमता आहे. ‘गोल्ड सिटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून जळगावचा सर्वांगीण विकास साधता येईल. तसेच चेंबरतर्फे ‘बिझनेस फोरम’ सुरू करण्याचे नियोजन असून, याचा फायदा विविध उद्योगांना होईल.”
कार्यक्रमाला MACCIA चे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, राष्ट्रीय समन्वयक वेदांशू पाटील, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य दिलीप गांधी, तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, उद्योगपती, कृषी क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनकुमार परदेशी, धनराज कासट, महेंद्र रायसोनी, अरविंद दहाड, विनोद बियाणी, किरण बच्छाव, राहुल बैसाणे यांनी सहकार्य केले. स्वागत दिलीप गांधी, सूत्रसंचालन सरिता खचणे, तर आभारप्रदर्शन अरविंद दहाड यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम