जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे 220 कोटी अनुदान

बातमी शेअर करा...

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे 220 कोटी अनुदान

जळगाव : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या जळगाव परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. परिमंडलातील 31 हजार 648 वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडील प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता 116.88 मेगावॅट आहे. 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान असलेल्या या योजनेत 220 कोटी रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे.

        दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेत ऑगस्टअखेर जळगाव मंडलातील 19 हजार 499 ग्राहकांनी 72.49 मेगावॅट, धुळे मंडलातील 8 हजार 361 ग्राहकांनी 30.79 मेगावॅट तर नंदुरबार मंडलातील 3 हजार 788 ग्राहकांनी 13.60 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर उभारले आहेत. परिमंडलातील 31 हजार 648 ग्राहकांपैकी 28 हजार 356 ग्राहकांच्या बँक खात्यात 220 कोटी 36 लाख रुपयांचे अनुदान जमा झाले असून, उर्वरित ग्राहकांचे अनुदान वळते करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जळगाव मंडलातील 17 हजार 440 ग्राहकांना 135 कोटी 48 लाख, धुळे मंडलातील 7 हजार 473 ग्राहकांना 58 कोटी 11 लाख तर नंदुरबार मंडलातील 3 हजार 443 ग्राहकांना 26 कोटी 77 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे संच बसवणाऱ्या वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या संचासाठी 78 हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते. गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल जवळपास शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला देता येते.

         प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना लागणारे सोलर नेट मीटर महावितरणकडून विनामूल्य पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांचे पैसे वाचण्यासोबत त्यांना मोबाईल फोनवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिट इत्यादी माहिती दररोज मिळेल. त्यानुसार त्यांना वीजबिल कमी करण्यासाठी नियोजन करता येत आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. महावितरण ही या योजनेची अंमलबजावणी करणारी राज्यातील नोडल एजन्सी आहे. महावितरणने यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना व पुरवठादारांना महावितरणच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता राहत नाही. नोंदणी केल्यापासून अंतिम मंजुरीनंतर प्रकल्प सुरू करेपर्यंत ‘फेसलेस’ व ‘पेपरलेस’ पद्धतीने काम चालू राहते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत गतिमानता आली आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळते. शिवाय योजनेत 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे. वीजग्राहकांना नेट मीटरही महावितरणकडून देण्यात येते. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

–        आय.ए. मुलाणी, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडल

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम