जळगाव पीपल्स बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सुरू असलेले आमरण अन्नत्याग उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच

उपोषणार्थी सागर ओतारींची प्रकृती खालावली

बातमी शेअर करा...

जळगाव पीपल्स बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सुरू असलेले आमरण अन्नत्याग उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच

उपोषणार्थी सागर ओतारींची प्रकृती खालावली

चोपडा (प्रतिनिधी) –जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सागर काशिनाथ ओतारी यांनी दि. १४ ऑगस्टपासून चोपडा शहर पोलीस स्टेशनसमोर सुरू केलेले आमरण अन्नत्याग उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच असून, त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील
उपोषणकर्ते सागर ओतारी यांनी “न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील” असा निर्धार व्यक्त केला आहे. स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशीही न्यायासाठी उपोषण करावे लागत आहे, ही बाब पोलिस प्रशासनासाठी नामुष्कीची असल्याचे मत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

नागरिक व कार्यकर्त्यांचा पाठिंबा
शिवसेना शिंदे गटासह चोपडा शहर व तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपोषण स्थळी दाखल होत आहेत. पोलीस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत सर्वांनी उपोषणास पाठींबा दिला आहे.

हायकोर्टाचा आदेश, तरीही गुन्हा दाखल नाही
२६ एप्रिल २०२५ रोजी दाखल केलेल्या फिर्यादीवर अद्यापही गुन्हा दाखल न झाल्याने शंका निर्माण होत आहे. बँकेने या तक्रारीविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र २४ जून २०२५ रोजी न्यायालयाने ही याचिका रद्द केली. तरीदेखील गुन्हा नोंदवला गेला नाही, यावरून पोलिस प्रशासनावर बँकेला पाठीशी घालण्याचे आरोप होत आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचा अडथळा?
तपास अधिकाऱ्यांनी वारंवार गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी परवानगी मागितली असतानाही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्याने संशय अधिक गडद झाला आहे. यामुळे चोपडा पोलिसांवर जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या

संबंधित आरोपींवर तातडीने गुन्हा नोंदवून अटक करावी.

जळगाव पीपल्स बँकेला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व जबाबदारांची चौकशी करावी.

प्रकृती खालावली, तरी उपचार नाकारले
उपोषणार्थी सागर ओतारी यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक दिवसातून दोन वेळा तपासणी करत आहे. त्यांना उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला गेला; मात्र त्यांनी उपचार व रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आहे.या उपोषणामुळे संपूर्ण चोपडा शहरात अस्वस्थता असून, नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम