जळगाव मनपाची १९ प्रभागांची अंतिम रचना जाहीर

बातमी शेअर करा...

जळगाव मनपाची १९ प्रभागांची अंतिम रचना जाहीर

जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीत एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रशासनाने १९ प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली. प्रारूप रचनेवर आलेल्या ७० हरकतींपैकी फक्त ६ हरकती मान्य करण्यात आल्या, तर उर्वरित फेटाळण्यात आल्या. प्रभाग क्रमांक ४ आणि ५ मध्ये किरकोळ बदल करण्यात आले असून, सर्वाधिक हरकती नोंदवलेला पिंप्राळा गावठाण भाग जसाच्या तसा कायम आहे.

महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात अंतिम नकाशासह ही रचना जाहीर केली. सकाळपासून नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार रचना पाहण्यासाठी महापालिकेत गर्दी करत होते. ही रचना महापालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करवण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये गट क्रमांक ६९ चा समावेश करण्याची हरकत मान्य करत, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट जळगाव सार्वजनिक शाळा, नेरी नाका खासगी बसस्थानक आणि जोशी पेठ वखार यांचा समावेश या प्रभागात करण्यात आला. यामुळे प्रभाग ५ मधून हा भाग वगळण्यात आला. माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या हरकतीनंतर हा बदल लागू करण्यात आला.

पूर्वी प्रभाग ५ ची हद्द अजिंठा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिणेकडून लेंडी नाल्यापर्यंत होती. आता ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या उत्तरेकडून पुढे लेंडी नाल्यापर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही प्रभागांच्या सीमारेषांमध्ये स्पष्ट बदल झाले आहेत.

आता सर्वांचे लक्ष प्रभागांच्या आरक्षणाकडे लागले आहे. २०१८ च्या आरक्षणानुसार निवडणूक होणार असून, ७५ पैकी ५२ जागा आरक्षित असतील. नव्या प्रभाग रचनेनुसार कोणता प्रभाग कुणासाठी राखीव राहील, यावर राजकीय समीकरणे अवलंबून असतील.

२०१८ च्या निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र, पक्षफुटीमुळे सत्ता शिवसेनेकडे गेली. आता शिवसेना विभागली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर अजित पवार गटाला बळकटी देत आहेत. भाजपने महायुतीच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दोन्ही मित्र पक्ष सावध भूमिका घेताना दिसत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम