जळगाव मनपा निवडणुक : महायुतीचा ब्लॉकब्लस्टर धमाका !

बातमी शेअर करा...

जळगाव मनपा निवडणुक : महायुतीचा ब्लॉकब्लस्टर धमाका !

भाजप सेनेच्या प्रयेकी ६ जागा बिनविरोध ; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत चक्क १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी प्रत्येकी ६ जागा जिंकत समसमान वाटा उचलला आहे. ७५ जागांच्या महापालिकेत आता केवळ ६३ जागांसाठी मतदान होणार असून, मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा मोठा टप्पा ओलांडल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष पाहायला मिळत आहे.

असा रंगला बिनविरोध विजयाचा थरार: निवडणुकीच्या प्रारंभीच भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे (प्रभाग १२ ब) यांनी बिनविरोध निवडीचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर गुरुवारी माघारीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख आणि आमदार पुत्र डॉ. गौरव सोनवणे यांची निवड निश्चित झाली.

आज, शुक्रवारी (२ जानेवारी) माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. सकाळी प्रभाग १९ (अ) मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या उमेदवार सरला सोनवणे यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या रेखा चुडामण पाटील यांचा विजय सुकर झाला. पाठोपाठ दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रभाग ७ (क) मधून आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे यांच्या विरोधातील अपक्षांनी माघार घेतल्याने त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

शेवटच्या तासांत ‘बिनविरोध’ची लाट: दुपारच्या सत्रात महायुतीने आपला वेग कायम राखला. प्रभाग ७ (अ) मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री हिवराळे यांनी माघार घेतल्याने भाजपच्या दीपमाला काळे बिनविरोध झाल्या. प्रभाग २ (अ) मध्ये शिवसेनेच्या सागर सोनवणे यांच्या विरोधातील ५ अपक्षांनी माघार घेतली. तसेच, प्रभाग १६ (अ) मधून भाजपचे डॉ. विश्वनाथ खडके, १३ (क) मधून वैशाली पाटील, ७ (ब) मधून अंकिता पाटील आणि प्रभाग १९ (ब) मधून शिवसेनेचे गणेश उर्फ विक्रम सोनवणे यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे निश्चित झाली आहे.

राजकीय गणिते बदलली: पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या रणनीतीमुळे महायुतीने मतदानापूर्वीच डझनभर जागा खिशात घातल्या आहेत. या विजयामुळे महापालिका प्रांगणात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत महायुतीच्या समर्थकांनी जल्लोष केला. आता उर्वरित ६३ जागांसाठी १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, महायुतीने मिळवलेल्या या सुरुवातीच्या यशामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम