जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग १८ ‘अ’ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे बिनविरोध

बातमी शेअर करा...

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग १८ ‘अ’ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे बिनविरोध

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपनंतर आता शिवसेनेनेही बिनविरोध विजयाची नोंद घेतली आहे. प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ (अनुसूचित जमाती राखीव) या जागेतून शिवसेनेचे उमेदवार गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, या घडामोडीमुळे शिवसेना गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल जाहीर होताच शिवसैनिकांनी महापालिका परिसरात जल्लोष साजरा केला.

प्रभाग १८ ‘अ’ या अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी शिवसेनेतर्फे गौरव सोनवणे यांच्यासह मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यावर मयूर सोनवणे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने गौरव सोनवणे यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गौरव सोनवणे यांच्या बिनविरोध निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले.

आमदारपुत्राचा राजकारणात दमदार प्रवेश

बिनविरोध निवडून आलेले गौरव चंद्रकांत सोनवणे हे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र आहेत. उच्चशिक्षित, सामाजिक कार्याची पार्श्वभूमी आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या गौरव सोनवणे यांच्या उमेदवारीकडे सुरुवातीपासूनच लक्ष लागले होते. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिवसेनेने जळगाव महापालिकेच्या राजकारणात आपली ताकद दाखवून दिली असून, आगामी निवडणूक टप्प्यांत राजकीय चुरस आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम