
जळगाव महानगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर
जळगाव महानगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर
१९ प्रभागांमध्ये विविध प्रवर्गांचे आरक्षण निश्चित
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव महानगरपालिकेच्या बहुचर्चित प्रभाग आरक्षणाची सोडत आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या सभागृहात उत्साहात काढण्यात आली. या वेळी नागरिक, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती. आरक्षणाचे चिठ्ठीद्वारे सोडत काढताना वातावरणात उत्सुकतेचा आणि तणावाचा माहोल निर्माण झाला होता.
महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी आणि नगर सचिव मनोज शर्मा उपस्थित होते. एकामागोमाग एक प्रभागांचे आरक्षण जाहीर होत असताना उपस्थितांमध्ये हळहळ, आनंद, समाधान आणि आश्चर्य अशा मिश्र भावना दिसून आल्या.
संपूर्ण आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट चित्र समोर आले असून कोणत्याही मोठ्या प्रस्थापित नेत्याला धक्का बसलेला नाही. मात्र आता तिकिटासाठी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होणार हे निश्चित झाले आहे. अनेक प्रभागांमध्ये ‘ड’ हा सर्वसाधारण असल्याने जुन्या नगरसेवकांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या वेळी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवल्या गेल्या आहेत. १९ प्रभागांपैकी १८ प्रभागांमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्याने महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. काही प्रभागांत सलग दुसऱ्यांदा महिलांसाठी जागा राखीव झाल्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खाली प्रभागनिहाय आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे –
प्रभाग १: अ – अनुसूचित जाती महिला | ब – नागरिकांचा मागासवर्ग | क – सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण
प्रभाग २: अ – अनुसूचित जमाती | ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला | क – सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण
प्रभाग ३: अ – अनुसूचित जाती महिला | ब – अनुसूचित जमाती महिला | क – नागरिकांचा मागासवर्ग | ड – सर्वसाधारण
प्रभाग ४: अ – अनुसूचित जाती महिला | ब – नागरिकांचा मागासवर्ग | क – सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण
प्रभाग ५: अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला | ब – सर्वसाधारण महिला | क – सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण
प्रभाग ६ ते ९: प्रत्येक ठिकाणी ‘अ’ – नागरिकांचा मागासवर्ग महिला, ‘ब’ व ‘क’ – सर्वसाधारण महिला, ‘ड’ – सर्वसाधारण
प्रभाग १०: अ – अनुसूचित जाती | ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला | क – सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण
प्रभाग ११: अ – अनुसूचित जमाती महिला | ब – नागरिकांचा मागासवर्ग | क – सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण
प्रभाग १२: अ – अनुसूचित जाती | ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला | क – सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण
प्रभाग १३ ते १४: अ – नागरिकांचा मागासवर्ग | ब, क – सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण
प्रभाग १५ ते १७: अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला | ब, क – सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण
प्रभाग १८: अ – अनुसूचित जमाती | ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला | क – सर्वसाधारण महिला
प्रभाग १९: अ, ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला | क, ड – सर्वसाधारण महिला
या आरक्षणामुळे महापालिकेतील महिलांचे प्रतिनिधित्व विक्रमी पातळीवर जाणार आहे. आगामी निवडणुकीत महिलांची झुंबड उडणार असून नवोदित महिला नेत्यांना उभारी मिळेल, असे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, आरक्षण जाहीर होताच शहरातील सर्व राजकीय पक्षांनी अंतर्गत चर्चांना वेग दिला असून इच्छुक उमेदवारांनी तयारीचा धडाका सुरू केला आहे. सोशल मीडियावरही भावी नगरसेवकांच्या पोस्टरबाजीला आता ऊत येणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम