
जळगाव रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरट्यांवर आरपीएफची कारवाई; दोन आरोपी अटकेत, पाच मोबाईल जप्त
जळगाव रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरट्यांवर आरपीएफची कारवाई; दोन आरोपी अटकेत, पाच मोबाईल जप्त
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरात वाढत असलेल्या मोबाईल चोरीच्या घटनांवर काहीसा अंकुश लावत जळगाव रेल्वे पोलीस दलाने (आरपीएफ) गुरुवारी (दि. २६ जून) सायंकाळी मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन सराईत मोबाईल चोरांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण पाच महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ही माहिती आरपीएफ विभागाकडून देण्यात आली आहे.
सीसीटीव्हीच्या मदतीने चोरांचा पर्दाफाश
१७ जून रोजी भिकन नवल पाटील या प्रवाशाचा सुमारे १.३० लाख रुपये किमतीचा ‘सॅमसंग गॅलेक्सी’ मोबाईल बडनेरा–नाशिक मेमो एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढत असताना जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून चोरीला गेला होता. याप्रकरणी जीआरपी भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची गंभीर दखल घेत आरपीएफचे निरीक्षक अमित कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तपासात एक संशयित चोर ओळखला गेला. त्यानंतर विशेष पथकाने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संशयितावर पाळत ठेवून त्यास एका साथीदारासह अटक केली.
पाच मोबाईलची चोरी कबूल, दोघेही अटकेत
अटकेनंतर झालेल्या चौकशीत या दोन्ही आरोपींनी जळगाव शहर बसस्थानकातून आणखी तीन मोबाईल चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून मिळालेल्या एकूण पाच मोबाईल्सची एकूण किंमत लाखो रुपयांपर्यंत असल्याचे समजते.
अटकेतील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
शेख इमरान शेख गुफरान (वय २२, रा. मालेगाव)
शेख अश्फाक शेख मुस्ताक (वय ३०)
शेख इमरान याला पुढील कारवाईसाठी जळगाव शहर पोलिसांकडे, तर शेख अश्फाक याला जीआरपी भुसावळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी
या कारवाईत उपनिरीक्षक मनोज सोनी, एएसआय शिवपूजन सिंग, कॉन्स्टेबल पंकज वाघ, विनोद जेठवे आणि मनोज मौर्य यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम