
जळगाव विमानतळावर मोफत वैद्यकीय सुविधा केंद्र सुरु : प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक सेवा
जळगाव विमानतळावर मोफत वैद्यकीय सुविधा केंद्र सुरु : प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक सेवा
जळगाव : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव विमानतळावर मोफत वैद्यकीय सुविधा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रवासी आणि विमानतळावरील कर्मचारी यांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तत्काळ मिळणार आहेत.
या वैद्यकीय केंद्राचे उद्घाटन विमानतळाचे संचालक हर्ष त्रिपाठी, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्वीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. सुभाष बडगुजर, प्रशासकीय अधिकारी अशोक भिडे यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी धन्वंतरी पूजन व श्रीफळ फोडून उद्घाटन सोहळा पार पडला. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विमानतळ संचालक हर्ष त्रिपाठी म्हणाले, “आपत्कालीन आरोग्यसेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. जळगाव विमानतळावर ही सुविधा सुरु झाल्याने प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर उपचार मिळणे शक्य होणार आहे.”
डॉ. केतकी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “या केंद्रात डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि अत्यावश्यक औषधांचा साठा उपलब्ध आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता या केंद्राचा लाभ घ्यावा.”
या प्रसंगी विमानतळावरील सर्व कर्मचारी उपस्थित होते. हे वैद्यकीय केंद्र जळगाव विमानतळासाठी एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम