जळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकींना प्रारंभ

बातमी शेअर करा...

जळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकींना प्रारंभ

पोलीस सज्ज; मिरवणुकांवर ड्रोनची नजर

जळगाव: शहरात आज (६ सप्टेंबर) गणरायाला मोठ्या भक्तिमय वातावरणात निरोप दिला जात आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, विसर्जन मिरवणुकांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. मेहरूण तलावावर आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारीही पूर्ण झाली आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवरून सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यात पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, आरसीपी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स आणि क्यूआरटी पथकही सज्ज ठेवले आहे.

पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक हे स्वतः मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी १० वाजता महापालिकेतील मानाच्या गणपतीची आरती झाल्यानंतर कोर्ट चौकातून मिरवणुकीला सुरुवात होईल.

मेहरूण तलावावर विशेष व्यवस्था

मेहरूण तलावावर विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. येथे लाईटची व्यवस्था, तराफे आणि बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी जीव रक्षक बोट, ४५ व्यक्तींचे पथक आणि पट्टीचे पोहणारे जीवरक्षकही सज्ज ठेवले आहेत. मिरवणुकीतील निर्माल्य संकलनासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबतच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य आणि गणेश मंडळांचे स्वयंसेवक काम करणार आहेत.

याशिवाय, शहरात सात ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्रे तयार करण्यात आली आहेत, ज्यात महानगरपालिकेची लाठी शाळा, पांझरा पोळ शाळा, सागर पार्क, पिंप्राळा येथील निमडी शाळा, निमखेडी येथील पाण्याची टाकीजवळ, शिवाजीनगर येथील नाभिक समाज सभागृह आणि मेहरूण येथील साईबाबा मंदिराजवळील केंद्रांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम