जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

बंद घर व दुधाच्या टपऱ्यांमध्ये चोरी

बातमी शेअर करा...

जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

बंद घर व दुधाच्या टपऱ्यांमध्ये चोरी

जळगाव | प्रतिनिधी – शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी आणि चोरीच्या घटना घडवल्या. रामनगर भागातील बंद घर फोडून सोनं व रोकड चोरली, तर काव्यरत्नावली चौकात दोन दुधाच्या टपऱ्या फोडून गल्ल्यातील रक्कम लंपास करण्यात आली. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

रामनगर परिसरात डीमार्टसमोर राहणाऱ्या रचना वाडकर यांच्या नातेवाईकांचे घर काही दिवसांपासून बंद होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी दोन तोळे सोने व १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण लाखांच्या घरात ऐवज लंपास केला. सोमवारी, ५ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, याच रात्री काव्यरत्नावली चौकात चोरट्यांनी दोन दुधाच्या टपऱ्यांना लक्ष्य केले. आरटीओ कार्यालयासमोरील एका टपरीचे शटर उघडण्याचा प्रयत्न फसला, मात्र दुसऱ्या टपरीतील गल्ल्यातून १० हजार रुपयांची रोकड व इतर वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या.

या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने कळवण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम