
जळगाव शहरात थकित मजुरीच्या पैशावरून लोखंडी वस्तूने मारहाण
जळगाव शहरात थकित मजुरीच्या पैशावरून लोखंडी वस्तूने मारहाण
जळगाव : शहरातील एस.के. ऑइल मिल समोर शुक्रवारी (२६ सप्टेंबर) पहाटे थकित मजुरीचे पैसे मागितल्याने मजुरावर लोखंडी वस्तूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पीडितास गंभीर दुखापत झाली असून, आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणिक सुरेश भोसले (वय ५०, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी पहाटे सहा वाजता ते आपल्या थकीत मजुरीच्या रकमेबाबत मागणी करण्यासाठी शिवराम सुकलाल सपकाळे (वय ५०, रा. दूध फेडरेशन परिसर) याच्याकडे गेले होते.
दरम्यान, पैशांच्या मागणीवरून उभयतांमध्ये वाद झाला. संतापलेल्या शिवराम सपकाळे याने प्रथम शिवीगाळ केली आणि नंतर रागाच्या भरात लोखंडी वस्तूने भोसले यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडितास जीवे मारण्याची धमकी दिली.
जखमी अवस्थेत माणिक भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी शिवराम सुकलाल सपकाळे याच्याविरुद्ध मारहाण, गंभीर दुखापत व जीवे धमकी अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम