
जळगाव सी.ए. शाखेमध्ये “बँक ऑडीट” या विषयावर चर्चासत्र
बुद्धिमत्ता वापरून लेखापरीक्षण, कर्ज लेखापरीक्षण, याबद्दल मान्यवरांचे मार्गदर्शन
जळगाव सी.ए. शाखेमध्ये “बँक ऑडीट” या विषयावर चर्चासत्र
बुद्धिमत्ता वापरून लेखापरीक्षण, कर्ज लेखापरीक्षण, याबद्दल मान्यवरांचे मार्गदर्शन
जळगाव प्रतिनिधि
जळगाव सी.ए. शाखेमध्ये रविवार दि. १६-३-२०२५ रोजी बँक ऑडीट या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यशाळेच्या उदघाटन सत्रासाठी अरुणभाई गुजराथी व आमदारसत्यजीत तांबे यांना प्रमुख पाहुणे म्हणुन आणि मुंबई येथील आर. सी.एम. सी.ए. श्वेता जैन, पुणे येथील उदय कुळकर्णी, व जळगाव येथील सी.ए. परीक्षित भदादे यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये वक्त्यांनी बँक शाखेचे सी.बी.एस. व कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून लेखापरीक्षण, कर्ज लेखापरीक्षण, तसेच नियोजन आणि एन.पी.ए. मानदंड याबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल, उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल, सेक्रेटरी सी.ए. सोहन नेहेते, खजिनदार सी.ए. लक्ष्मिकांत लाहोटी, कार्यकारी मंडळ सदस्य सी.ए. नचिकेत जाखेटीया, सहकारी सदस्य सी.ए. हितेश जैन तसेच सी.ए. सभासद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चासत्राच्या प्रास्ताविकात हितेश आगीवाल यांनी – चार्टर्ड अकाउंटंट्स हे वित्तीय प्रामाणिकतेचे रक्षक आहेत. सीए वित्तीय प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आम्ही तंत्रज्ञानाशी सुसंगत आहोत, आणि लेखापरीक्षणामध्ये डिजिटल प्रगतीचे स्वागत करतो. चार्टर्ड अकाउंटंट हे राष्ट्र निर्माणातील महत्वाचे भागीदार आहेत. बँक ऑडिटमध्ये त्यांची भूमिका, विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑडिट, नियमांचे पालन सुनिश्चित करणे, आर्थिक अनियमितता ओळखणे आणि सार्वजनिक पैशाचे रक्षण करणे यासाठी महत्त्वपूर्ण आहे असे आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर प्रमुख पाहुणे अरुणभाई गुजराथी व सत्यजित तांबे यांनी सी.ए. हे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. सी.ए. ना व सी.ए. चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच्या बदलणाऱ्या कायद्यांचा अभ्यास करून अपडेट राहावे लागते तसेच बँकिंग क्षेत्रात कर्जवाटप करताना नफ्याचे प्रमाण योग्य रीतीने हाताळून केले गेले पाहिजे तसेच शासनाने लेखा परीक्षकाची नेमणूक हि ऑटोमॅटीक पद्धतीने केली पाहिजे असे आपले मनोगत व्यक्त केले.
चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात अध्यक्ष म्हणुन अभिषेक धामणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सत्रात पुणे येथील उदय कुळकर्णी यांनी “बँक शाखेचे सी.बी.एस. व कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून लेखापरीक्षण” या विषयावर सदस्यांना मार्गदर्शन करताना बँक शाखेच्या ऑडिटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आत्मसात केल्याने फसवणूक शोधण्यात सुधारणा करून आणि जोखीमीचे मूल्यांकन करून ऑडिट क्षमता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. असे मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये अध्यक्ष म्हणुन प्रशांत अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सत्रात मुंबई येथील आर.सी.एम. श्वेता जैन “कर्ज लेखापरीक्षण” या विषयावर बोलताना बँकेच्या शाखेने नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे का, बँक कर्ज, बुडीत कर्जांसाठीच्या तरतुदी आणि मालमत्तेचे वर्गीकरण याबाबत RBI च्या नियमांचे पालन करत आहे का. योग्य कागदपत्रे ठेवली गेली आहेत आणि कर्ज मंजूरी प्राधिकरणाच्या मर्यादेत आहेत आणि अंतर्गत धोरणांचे पालन बँक करते का याची खात्री लेखापरीक्षण करताना करून घेणे गरजेचे असते असे मार्गदर्शन उपस्थित सभासदांना केले.
तिसऱ्या सत्रात अध्यक्ष म्हणुन सोहन नेहेते उपस्थित होते. या सत्रात जळगाव येथील . परीक्षित भदादे यांनी “नियोजन आणि एन.पी.ए. मानदंड” या विषयावर बोलताना बँकेच्या शाखेच्या लेखापरीक्षणात, बँकेच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यासाठी, विशेषत: कर्जे आणि अग्रिमांच्या बाबतीत योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असते. लेखापरीक्षक बँकेचे आर्थिक आरोग्य अबाधित राहतील आणि बँक NPA शी संबंधित सर्व नियामक आवश्यकतांचे पालन करत असल्याची खात्री करण्यात मदत करू शकतात असे मार्गदर्शन उपस्थित सभासदांना केले.
या चर्चासत्राचे सूत्र संचालन सोहन नेहेते व लक्ष्मिकांत लाहोटी, हितेश जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन सी.ए. नचिकेत जाखेटीया यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम