
जळोद रस्त्यावर ५६ किलो गांजा जप्त
अमळनेर पोलिसांची कारवाई ; दोघांना अटक
अमळनेर : जळोद रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत ५६ किलो ९७० ग्रॅम गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत वाहनासह एकूण १९.३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २८ मार्च रोजी रात्री १०.५० वाजता गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलिसांना एका पांढऱ्या बोलेरो पिकअप (एमएच १८ एजे ०२२३) मधून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.
तपासादरम्यान गाडीमध्ये १८ पॅकेटमध्ये भरलेला ओलसर गांजा आढळला, ज्याचे वजन ५६ किलो ९७० ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे ११ लाख ३९ हजार रुपये आहे. बोलेरो वाहनाची किंमत ८ लाख रुपये असल्यामुळे एकूण जप्त मुद्देमाल १९.३९ लाख रुपये एवढा झाला आहे.
या प्रकरणात मनोज सोनू पावरा (२४, महादेव सोनपाडा, ता. शिरपूर) आणि सीताराम वेळू सोनवणे (५२, वलवाडी, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम