जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार; सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार

बातमी शेअर करा...

जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार; सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार

जळगाव, दि. ११ जुलै २०२५: जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये ‘उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरण सहा पुरस्कारांचे मानकरी ठरले. यामध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचा वैयक्तिक गटात दोन पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

मानव संसाधन विकासाला चालना, कर्मचारी क्षमता, कौशल्य व ज्ञानाचा विकास, नवीन संकल्पना, एआय तंत्रज्ञान तसेच हरित ऊर्जेचा वापर व योजना आदींवर मुंबई येथे गुरूवारी (दि. १०) एक दिवसीय जागतिक मानव संसाधन विकास परिषद झाली. देशभरातील खासगी व सरकारी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित होते. यावेळी महावितरणकडून कर्मचारी प्रशिक्षण, विद्युत सुरक्षा मोहीम, एआय तंत्रज्ञानाचा वापर, हरित ऊर्जेवरील विविध योजनांची माहिती देण्यात आली.

या परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ अंतर्गत विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात महावितरणला सहा पुरस्कारांनी गौरवण्यात आले. सांघिक गटामध्ये, शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘बेस्ट इनोव्हेशन इन पॉवर/ एनर्जी’, मानव संसाधन विभाग अंतर्गत कर्मचारी कौशल्य विकास, क्षमतावाढ प्रशिक्षण व विद्युत सुरक्षेचे उपक्रम यासाठी ‘अवार्ड फॉर एक्सलेन्स इन ट्रेनिंग’, पुणे येथील हरित ऊर्जेवरील राज्यात पहिल्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी ‘बेस्ट एनवायरनमेंट फ्रेंडली प्रोजेक्ट’ हे तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना वैयक्तिक गटात ‘सीएमडी ऑफ द इयर’ व ‘लिडरशिप एक्सलेन्स इन टेक्नोलॉजी इनोव्हेशन’ हे दोन पुरस्कार तर संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना ‘प्राईड ऑफ द प्रोफेशन’ पुरस्कार जाहीर झाला. या परिषदेत मानव संसाधन विकासाचे विशेषज्ञ डॉ. आर. एल. भाटिया, ‘आयआयएमए’च्या माजी अधिष्ठाता डॉ. इंदिरा पारेख यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट, कार्यकारी अभियंता (प्रशिक्षण) श्री. नरेंद्र सोनवणे, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी, सहायक अभियंता श्री. रूपेश खरपकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम