
जामनेरमध्ये मुस्लिम तरुणाच्या मॉब लिंचिंगचा ‘एकता संघटने’कडून तीव्र निषेध
जामनेरमध्ये मुस्लिम तरुणाच्या मॉब लिंचिंगचा ‘एकता संघटने’कडून तीव्र निषेध
प्रशासन आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; तातडीने कारवाईची मागणी
जामनेर: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बेटावद गावात २१ वर्षीय सुलेमान पठाण याची मॉब लिंचिंगमध्ये अमानुष हत्या झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. या दुर्दैवी घटनेला तीन दिवस उलटूनही स्थानिक पोलीस पाटील, सरपंच आणि या भागाचे आमदार तथा मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबाला भेटून सांत्वन न केल्याने प्रशासकीय मौनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकता संघटनेचे सांत्वन आणि मदतीचे आश्वासन
एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मृत सुलेमानच्या कुटुंबाची भेट घेतली. सुमारे दोन तास त्यांनी कुटुंबाला धीर दिला आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मौलाना ओसामा यांनी कुराणच्या शिकवणीनुसार संयमाचे महत्त्व स्पष्ट केले. या घटनेने माणुसकीला काळिमा फासल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
एकता संघटनेने प्रशासनाकडे या घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषतः, घटनेनंतर स्थानिक पोलीस पाटील, सरपंच आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मदत किंवा सांत्वन न मिळाल्याने अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
या संदर्भात फारुख शेख म्हणाले, “महाराष्ट्र राज्यात अशा घटना घडणे निषेधार्ह आहे. या घटना रोखण्यासाठी प्रशासन आणि सर्व राजकीय पक्षांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्या लागतील.”
शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन
संघटनेने नागरिकांना शांतता, बंधुता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्या शक्तींना विरोध करण्याचे आवाहनही त्यांनी केले. शिष्टमंडळात फारुख शेख यांच्यासह हाफिज रहीम पटेल, मौलाना ओसामा फलाही, मतीन पटेल, अनिस शाह, अन्वर सिकलगार, कासिम उमर, अतीक अहमद, आरिफ अजमल (सर्व जळगाव एकता संघटनेचे), कुर्बान शेख (फैजपूर), इरफान शेठ (चीनावल), अजगर शेख (सावदा) आणि जावेद जनाब (मारुळ) यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पहिल्या दिवसापासून पीडित कुटुंबाला आधार देणारे जावेद मुल्लाजी, अशफाक पटेल, आसिफ शेख, जुबेर शेख, शकील मुसा आणि उमर सय्यद (जामनेर) हे देखील या शिष्टमंडळात होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम