
जामनेरमध्ये २१ वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या
जामनेरमध्ये २१ वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या
१५ ते २० जणांच्या जमावाने केला हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
जामनेर (जळगाव): जामनेर तालुक्यात एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृणपणे मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुलेमान रहीम खान (वय २१, रा. छोटा बेटावद) असे मयत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनीही घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली आहे.
नेमके काय घडले?
सुलेमानचे वडील रहीम खान पठाण यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा सुलेमान ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता नोकरीचे फॉर्म भरण्यासाठी जामनेर येथे गेला होता. दुपारी ४.३० च्या सुमारास रहीम खान यांना फोनवरून माहिती मिळाली की, बेटावद खुर्द येथील बसस्थानकावर १० ते १५ लोक सुलेमानला मारहाण करत आहेत. ते तात्काळ पत्नी आणि मुलीसोबत घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी पाहिले की, सुलेमान जमिनीवर पडलेला होता आणि अभिषेक राजपूत, रणजीत रामकृष्ण माताडे, आदित्य देवरे, सोज्वळ तेली, कृष्णा तेली यांच्यासह १० ते १२ अनोळखी लोक त्याला लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉड आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत होते. सुलेमानला वाचवण्यासाठी त्याचे आई-वडील आणि बहीण मध्ये पडले असता, जमावाने त्यांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. ‘आज यांना सोडणार नाही, यांची इज्जत लुटून टाकू’, अशी धमकीही जमावाने दिली.
जामनेरहून बेटावदपर्यंत मारहाण
गावातील काही नागरिक मदतीला आल्याने आरोपी पळून गेले. जखमी अवस्थेतील सुलेमानला कुटुंबीयांनी घरी आणले. त्याला मारहाणीबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की, त्याला सुरुवातीला जामनेर शहरातील ‘ब्रँड कॅफे’ येथे मारहाण करण्यात आली आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर त्याला बेटावद खुर्द येथील बसस्थानकावर आणून पुन्हा अमानुष मारहाण करण्यात आली.
गंभीर जखमी झालेल्या सुलेमानला तात्काळ जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी वडील रहीम खान पठाण यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कासार करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम