जिल्‍हयात 17 सप्‍टेंबरपासून स्‍वच्‍छता सेवा पंधरवडा-  मिनल करनवाल 

बातमी शेअर करा...

जिल्‍हयात 17 सप्‍टेंबरपासून स्‍वच्‍छता सेवा पंधरवडा-  मिनल करनवाल 

नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन

जळगाव दि.१५(प्रतिनिधी) स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2025 पंधरवडा दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत “स्वच्छोत्सव” या थीमखाली साजरा करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच विविध विभागांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले आहे.
या पंधरवड्यादरम्यान प्रमुख उपक्रमांतर्गत अस्वच्छ ठिकाणांची निवड करून साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव, स्वच्छ सुजल गाव संकल्पनेशी निगडित प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्‍यात येणार आहेत. तसेच या कालावधीत विशेष ग्रामसभांचे आयोजन करून हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव व स्वच्छ सुजल गाव घोषित करण्याचे उद्दिष्ट आहे.

दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी “एक दिवस – एक तास – एक सोबत” या संकल्पनेतून देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्‍या गावात सामूहिक श्रमदान करून स्वच्छता मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

दि. 17 सप्टेंबर रोजी या अभियानाचा शुभारंभ होणार असून यात स्थानिक संस्था, विविध विभाग, कार्यालये, लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन प्रभावी जनजागृती राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात सहभागी होऊन या अभियानाला यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक डॉ.सचिन पानझडे यांनी केले आहे.

स्वच्छता ही सेवा पंधरवडा म्हणजे केवळ मोहिम नसून हा सामूहिक कृतीचा उत्सव आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहभागातूनच जळगाव जिल्हा स्वच्छ, निरोगी व सुजल बनविण्याचे ध्येय साध्य होईल. – मुख्य कार्यकारी अधिकारी,मिनल करनवाल

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम