जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तहसील व भूमी अभिलेख विभागाचा आढावा

बातमी शेअर करा...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तहसील व भूमी अभिलेख विभागाचा आढावा

जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील तहसिल कार्यालये आणि भूमी अभिलेख विभागातील कामकाजाचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील तहसिलदार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत मोजणी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांपासून ते कार्यालयीन प्रलंबित कामकाजापर्यंत सर्व बाबींची सविस्तर चर्चा झाली.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी श्री.घुगे यांनी जिल्ह्यातील मोजणी प्रक्रियेतील अनावश्यक विलंबाबाबत चर्चा करत, तातडीने सुधारणा करून ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्याचे निर्देश दिले. प्रलंबित असलेल्या मोजण्या संदर्भात नियोजित वेळापत्रक तयार करून कामे पूर्ण करण्याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावी, असेही त्यांनी सांगितले. भूमी अभिलेख विभागातील तांत्रिक सुविधा, मनुष्यबळातील कमतरता, उपकरणांची उपलब्धता, तसेच तांत्रिक त्रुटी अशा विषयांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या विभागांकडून स्वतंत्र आणि सध्यास्थिती अहवाल तातडीने मागविले आहेत.

तहसिल कार्यालयांतील प्रशासकीय कार्यप्रवाह नागरिकांना दिल्या जाणाऱ्या जमीन प्रकरण सेवांशी थेट संबंधित असल्याने त्यामध्ये आणखी सुलभता आणण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. जमीन संदर्भातील प्रकरणांचा निपटारा निश्चित कालमर्यादेत करणे अनिवार्य असून, कोणतेही प्रकरण अनावश्यकपणे प्रलंबित ठेवू नये, अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली. नागरिकांच्या अपेक्षांनुसार आणि नियमबद्ध पद्धतीने कामकाज होण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत कामकाजाच्या नियमित परीक्षणालाही विशेष महत्त्व देण्यात आले. प्रगतीचा साप्ताहिक आढावा घेऊन प्रत्यक्ष कामकाजाचा वेग वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकारी–कर्मचाऱ्यांनी पारदर्शकतेचे तत्त्व काटेकोरपणे पाळावे, तसेच कोणतीही तक्रार प्रलंबीत राहू नये यासाठी जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर ,निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण संबंधीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम