
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेशबंदी; ‘दादां’च्या आदेशाचे पालन
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेशबंदी; ‘दादां’च्या आदेशाचे पालन
जळगाव: जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (२९ ऑगस्ट) पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे गटाचे असतानाही नियोजन भवनात ‘दादां’चाच आदेश चालतो, असे या घटनेतून दिसून आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या जिल्हा नियोजन भवनामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, पालकमंत्री गुलाबराव पाटील, बुलढाण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अमोल पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीपूर्वी पोलिसांकडून सर्वांची ओळखपत्रे तपासण्यात येत होती. यावेळी पत्रकारांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश आहे, पत्रकारांना प्रवेश नाही,” असे पोलिसांनी सांगितले. या निर्णयाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही सहमती दिल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीतही पत्रकारांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. आजच्या बैठकीतही तीच परिस्थिती निर्माण झाली. फक्त बैठकीच्या सुरुवातीला फोटो काढण्यासाठी पत्रकारांना परवानगी दिली जाईल, असे जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटाचे असतानाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदाराचा प्रभाव बैठकीत दिसून आल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम