जिल्हा परिषदेसमोर आशा स्वयंसेविकांचे थाळीनादासह ठिय्या आंदोलन

बातमी शेअर करा...

जिल्हा परिषदेसमोर आशा स्वयंसेविकांचे थाळीनादासह ठिय्या आंदोलन

 

जळगाव प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारत जिल्हा परिषदेवर मोठा मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात स्वयंसेविकांनी थाळीनाद करत ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. शासकीय कर्मचारी दर्जा, थकीत मानधन, आरोग्यवर्धिनी रक्कम तसेच कामावरून हटवलेल्या स्वयंसेविकांच्या पुनर्नियुक्तीसह विविध मागण्या या आंदोलनातून मांडण्यात आल्या.

आंदोलकांनी प्रशासनाकडे जुलै २०२५ पासून थकीत असलेले मानधन तातडीने देण्याची आणि पुढे दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत नियमित मानधन मिळावे, अशी मागणी केली. याशिवाय आरोग्यवर्धिनी कार्यक्रमातील रक्कम कपात न करता पूर्ण देणे, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची रक्कम तत्काळ अदा करणे, तसेच मासिक कामाचा तपशील आणि वेतन पावती देणे, अशा मागण्या सुद्धा करण्यात आल्या.

सामान्य आजारांसाठी रजा, बाळंतपणाची सुट्टी, तसेच आयुष्यमान भारत, हत्तीरोग, कुष्ठरोग, एनसीडीसह राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतील थकीत मानधन त्वरित देण्याची मागणीही या आंदोलनात झाली.

यावेळी कामावरून हटवलेल्या समिना तडवी आणि अन्नू तडवी या स्वयंसेविकांना तात्काळ पुनर्नियुक्ती देण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली. या मोर्चात राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सरचिटणीस भगवान दवणे, डॉ. रासकर, जिल्हाध्यक्ष संगीता भामरे, भारती मस्के, निरंजना तायडे, सुलोचना साबळे, मालुताई नरवडे, मीनाक्षी सोनवणे, सुषमा चव्हाण व भानुदास पाटील यांच्यासह २०० ते ३०० स्वयंसेविका सहभागी झाल्या.

आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रशासनाने मागण्या तत्काळ मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वयंसेविकांनी यावेळी दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम