
जिल्हा परिषद म्हणजे जनतेच्या आशा-आकांक्षांचा बळकट किल्ला
जिल्हा परिषद म्हणजे जनतेच्या आशा-आकांक्षांचा बळकट किल्ला
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नाविन्यपूर्ण उपक्रमांचा गौरवसमारंभ उत्साहात संपन्न
जळगाव – “जिल्हा परिषद म्हणजे केवळ कार्यालय नसून सामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचा बळकट किल्ला आहे. हा किल्ला सक्षम ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित नाविन्यपूर्ण उपक्रम बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, विविध गट विकास अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि शेतकरी उपस्थित होते.
आपल्या भाषणात पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद ही शासन आणि जनतेमधील विश्वासाची साखळी आहे. “ही दिवाळी नवी घरी” उपक्रमातून अनेक कुटुंबांना घराची स्वप्ने साकार झाली असून बेघरांच्या डोक्यावर छप्पर देणे ही समाजाप्रती असलेली खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. “ISO मिळविणे ही केवळ एक उपलब्धी नसून शिस्तबद्ध, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार हीच खरी ग्रामपंचायतींची ओळख असायला हवी,” असे ते म्हणाले. मानवतेच्या बळावर चालणारे प्रशासन असेल तर विकासात वेग आपोआप येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समारंभात ३५ ग्रामपंचायतींना १०० टक्के उद्दिष्टपूर्तीबद्दल गौरविण्यात आले. ISO मानांकन प्राप्त ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. ‘निपुण जळगाव’ अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान झाला. ‘मिशन दृष्टी’ अंतर्गत विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वितरण करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. राष्ट्रीय पोषण माह उपक्रमातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचेही कौतुक झाले.
यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व डॉ. अनिल झोपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘निपुण भारत’ उपक्रमाची माहितीपट प्रदर्शित झाला. पोषण माह निमित्त पाककलेचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले असून १९ स्टॉल्सना मान्यवरांनी भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘खानदेश का मेवा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
प्रास्ताविकात सीईओ मीनल करनवाल यांनी विभागांच्या सामूहिक समन्वयामुळे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर उल्लेखनीय स्थान मिळविल्याचे सांगितले. पुढील काळातही नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विकासाचा वेग अधिक वाढविण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम