
जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणांची १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणांची १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
जळगाव प्रतिनिधी – राज्यभरातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता पंचायत समिती सभापतींच्या आरक्षण सोडतीबरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणांच्या आरक्षणाचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात गट व गणांचे आरक्षण जाहीर होणार असून तहसील कार्यालयांमध्ये गणांची सोडत काढली जाणार आहे.
गेल्या महिन्यात जि.प अध्यक्षांचे आरक्षण सर्वसाधारणसाठी जाहीर झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमध्ये कोणत्या प्रवर्गाचा सभापती होणार हे ९ ऑक्टोबर रोजी निश्चित होणार आहे. आता गट-गणांचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार असून दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या वेळी लागू झालेल्या नव्या आरक्षण पद्धतीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील रावेर, यावल, चोपडा व मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गट राखीव होण्याची शक्यता आहे. एस.सी. व एस.टी. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण लागू होणार असल्याने सर्वाधिक गट रावेर मतदारसंघात राखीव होण्याची शक्यता वर्तवली जाते. परिणामी, अनेक विद्यमान सदस्यांचा पत्ता कट होणार असून जळगाव लोकसभा मतदारसंघातील जुन्या सदस्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. शासनाने नव्याने लागू केलेल्या पद्धतीमुळे अनेक माजी सदस्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
१३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत झाल्यानंतर १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान हरकती मागवण्यात येणार असून यासाठी चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हरकतींचा गोषवारा आयुक्तांकडे सादर करतील. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी आरक्षण अंतिम केले जाईल तर ३ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध होईल.
असा आहे कार्यक्रम
६ ऑक्टोबर – अनु.सुचित जाती-जमाती आरक्षण निश्चितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर
८ ऑक्टोबर – प्रस्ताव मान्यता
१० ऑक्टोबर – आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध
१३ ऑक्टोबर – गट व गणांचे आरक्षण सोडत
१४ ऑक्टोबर – प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध
१४ ते १७ ऑक्टोबर – हरकती दाखल करण्याची मुदत
२७ ऑक्टोबर – हरकतींवर गोषवारा सादर
३१ ऑक्टोबर – आरक्षण अंतिम
३ नोव्हेंबर – अंतिम आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम