
जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजाची योजना -संजय पवार
नियमित कर्जदारांना लाभ; थकबाकीदारांसाठी एकरकमी परतफेड योजना
जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजाची सौगुण योजना
नियमित कर्जदारांना लाभ; थकबाकीदारांसाठी एकरकमी परतफेड योजना
जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांसाठी शून्य टक्के व्याज सवलत योजना जाहीर केली आहे. ३१ मार्चपूर्वी केवळ मुद्दल भरल्यास शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात १० टक्के वाढीव कर्जपुरवठ्याची तरतूदही बँकेने केली आहे. ही माहिती बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नियमित शेतकऱ्यांना प्रोत्साहन
संजय पवार यांनी सांगितले की, “नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, थकबाकीदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.” बँकेने या वर्षी प्राथमिक विविध कार्यकारी संस्थांमार्फत आणि थेट कर्जवाटपाद्वारे २ लाख शेतकऱ्यांना १,०५२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले. यापैकी १ लाख ५९ हजार सभासदांना ७१४ कोटी, तर ४१ हजार सभासदांना थेट २३८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
बँकेकडे ८७ हजार शेतकऱ्यांची ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत थकबाकी भरून खाते शून्य करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध होईल. तसेच, २५ हजार शेतकऱ्यांची माहिती अचूक नसल्याने आणि केंद्राकडून व्याज सवलतीचा निधी न मिळाल्याने त्यांच्याकडून व्याज वसूल करावे लागणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी जिल्हा बँक आणि त्यांच्या शाखा सुटीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहतील. “शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करून या योजनांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन चेअरमन संजय पवार यांनी केले. यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.
या योजनांमुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर थकबाकीदार शेतकऱ्यांना एकरकमी परतफेडीचा पर्याय मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. बँकेच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गात स्वागत होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम